Wednesday, March 12, 2014

स्थानिक वृक्ष - पक्ष्यांच्या जगण्याचा आधार

स्थानिक झाडे म्हणजे काय?

एखाद्या प्रदेशात निसर्गत: आढळणाऱ्या वनस्पती म्हणजे स्थानिक वनस्पती. या स्थानिक वृक्ष-वल्लींवर आपले पशु-पक्षी, कृमी-किटके मुख्यत: आहार, आधार आणि निवारा यांसाठी विसंबून असतात. या वनस्पती स्थानिक पर्यावरणात (Ecosystem) एक महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वनस्पती वाढवणे आणि जोपासणे म्हणजे एक प्रकारे आपल्या निसर्गाचे संवर्धन करणेच होय.

एक साधी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे परदेशी झाडांवर आपले पक्षी-फुलपाखरे, मधमाश्या, सरपटणारे प्राणी, किटके इ. निर्वाह करू शकत नाहीत. कारण हि झाडे व त्यांची फुले, पाने, फांद्या, मुळे इ. सर्व या स्थानिक जीवांसाठी नवीन आहेत. उदा. गुलमोहर, कॉपरपॉड, निलगिरी, सुबाभूळ (याचे नाव तर 'कुबाभूळ' असायला हवे), रेन ट्री, जाकारंदा, ग्लिरिसीडीया, सिल्वर ओक इ. हि परदेशी झाडे असून भारतात काही दशकांपूर्वीच आली आहेत. याच काळात शहरे झपाट्याने वाढली आणि हिरवाई कमी होऊ लागली. परिणामी पशु-पक्ष्यांची संख्या पण झपाट्याने घटू लागली. कारण वेगाने बदलणारा अधिवास या जीवांना मानवला नाही. आज शहरांमध्ये मोठी-मोठी उद्याने व बगीचे आहेत. पण तिथे पक्षी घरटी करीत नाहीत, फुलपाखरांचे कोश दिसत नाहीत, सरडे आढळत नाहीत. कारण परदेशी झाडे जैविक अन्न-साखळीत प्रभावीपणे सहभागी होऊ शकत नाहीत. याउलट आपली स्थानिक झाडे हजारो वर्षांपासून या जीवांच्या मुलभूत गरजा पूर्ण करत आहेत. जैविक अन्न-साखळी किंवा अन्न-जाळे (Food-webs) हे निसर्ग व त्यातील जीव-जंतूच्या नाते-संबंधांचे प्रतिनिधित्व करते आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असते.

रहिवासी भागात म्हणजे शहरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने खालावली आहे हे तर सर्वश्रुत आहेच. परंतु यासोबत फुलपाखरे, मधमाशा, किटके, बेडूक, सरडे इ. ची संख्या ही रोडावते आहे या वास्तवाकडे आपले बहुतांशी दुर्लक्ष होत आहे. हे सर्व एकाच पर्यावरणाचे घटक असून एकमेकांवर अवलंबून आहेत. उदा. स्थानिक झाड असेल तर त्या झाडाच्या फुला-फळांवर उपजीविका करणारी फुलपाखरे, कीटक तिथे येतील; कीटकांमुळे सरडे, बेडूक व त्या कीटकांना खाणारे कीटक येतील; आणि हे सर्व असले तर त्या झाडावर लहान-मोठे पक्षी येतील. हे अन्न-साखळीचे एक उदाहरण झाले. आपल्याला अशी अनेक उदाहरणे आपण डोळसपणे पाहिल्यास आढळतील. इथे मी मुद्दामून सांगू इच्छितो कि हे कीटक म्हणजे डास, झुरळे असे उपद्रवी कीटक नसून परागीभवनात मदत करणारे उपयोगी कीटक आहेत. किंबहुना यातील बरेच कीटक उपद्रवी कीटकांवर जगतात.

शहरांमध्येच नाही तर लहान खेडोपाड्यामध्ये सुद्धा परदेशी झाडांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केलेली आहे. एक तर या वनस्पतींच्या बिया सहज रुजतात आणि दुसरे म्हणजे या वनस्पती पटकन पसरतात. उदा. सुबाभूळ, घाणेरी/ टणटणी इ. वनस्पती सर्वत्र अत्यंत झपाट्याने पसरत आहेत. आणि त्यांच्या वाढीला आळा घालणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. याचा एकत्रितरित्या परिणाम मूळ जंगलांवर होतो. परदेशी वनस्पती आपल्या मुळच्या जंगलांची आंतर-रचना बिघडवतात. तसेच आसपासच्या झाडांच्या वाढीवर ही विपरीत परिणाम करतात.

काहींचे याबद्दल दुमत असू शकते. काही तर या टोकापर्यंत जातात कि हि झाडे सुद्धा ऑक्सिजन देतात आणि लवकर वाढतात. अशा झाडांमुळे वाढते प्रदूषण आटोक्यात येऊ शकते. खरे आहे. पण जर तुमच्या इतक्याच अपेक्षा असतील तर गाजर गवत काय वाईट आहे मग?! कारण या गरजा गाजर गवत ही पूर्ण करू शकते. पण मग आपल्या पर्यावरणातील सजीव जातील कुठे??? या परदेशी वनस्पती आपल्या स्थानिक निसर्गातील सजीवांसाठी जवळ-जवळ प्लास्टिक सारखी भूमिका बजावतात.

हल्ली आपणा सर्वांना सगळे अगदी त्वरित आणि ताबडतोब हवे असते. झाडे सुद्धा हवीत फास्ट वाढणारी! परदेशी झाडे लावण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची सहजासहजी होणारी उपलब्धता आणि पटकन मिळू शकणारी हिरवाई. मग ती निरुपयोगी किंवा नुकसानकारक असली तरी चालेल. पण आपण इथे हे विसरतो कि त्वरित मिळणारा फायदा भविष्यात आपले फार मोठे अनपेक्षित नुकसान करू शकतो. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जी परदेशी झाडे आपण मोठ्या कौतुकाने लावतो ती लवकर वाढणारी असली तरी अल्पजीवी असतात. तसेच विविध आजारांना लवकर बळी पडणारी असतात. कारण एकच - ती आपल्या मातीतली नाहीत, स्थानिक नाहीत!!! आपली स्थानिक झाडे वाढीसाठी जरी प्रारंभी वेळ घेत असली, तरी ती दीर्घ-जीवी आणि रोग-प्रतिकारक आहेत. सोबत ती दु:ष्काळाला परिणामकारकरित्या तोंड देऊ शकतात.

तात्पर्य काय कि आपण आपल्या घर, व्यवसाय, ऑफिस, शाळा, कॉलेज इ. परिसरात शक्य तेथे फक्त स्थानिक झाडेच लावली आणि जगवली पाहिजेत. किंबहुना आपण परदेशी झाडे लावणे प्रामुख्याने टाळले पहिजे. कारण ही परदेशी झाडे आपल्या पशु-पक्ष्यांना, त्यांच्या अधिवासाला आणि क्वचित प्रसंगी आपल्याला सुद्धा कशी नुकसान पोहोचवू शकते हे आपण लक्षात घेत नाही.

विशेष म्हणजे असे नाही कि आपल्या मातीत रुजणारी झाडे बहुपयोगी नाहीत. परंतु त्याविषयी बहुसंख्य लोक अनभिज्ञ आहेत. आपण घरातल्या व्यक्तीस किंवा स्वत:सच विचारा - १० स्थानिक फुलणाऱ्या झाडांची नावे? सांगता येतात का?? आश्चर्य वाटेल परंतु भारतात जवळपास ४५००० वनस्पतींचा खजिना आहे. आणि त्यापैकी अंदाजे १५००० फुलणारी आहेत. महाराष्ट्रात यापैकी ४००० वनस्पती आहेत. आणि आपण हे सर्व विसरून, फक्त १५-२० परदेशी झाडांना प्राधान्य देवून आपल्याच निसर्गावर मर्यादा घालत आहोत. का व कशासाठी?

मी म्हणेन कि वृक्षारोपण करताना दुर-दृष्टी ठेवणे अधिक हितावह होईल…पर्यावरणाच्या , पशु-पक्ष्यांच्या आणि आपल्या भावी पिढीच्या हिताचे सुद्धा..! आपल्या परिसरात जर आपल्या मातीतली, स्थानिक झाडे लावलीत तर नाना प्रकारचे पक्षी आपल्या परिसरातच दिसतील. इतकेच नाही, तर आपल्या पर्यावरणाचा समतोल (Ecological Balance) ही शाबूत राहील. स्थानिक झाडांमध्ये बरीच सुंदर फुलणारी, फळे देणारी, सुवासिक, औषधी गुणधर्म असलेली बरीच बहुपयोगी झाडे आहेत. उदा. बहावा, पळस, तामण, भोकर, पांगारा इ. याविषयीची माहिती आपणांस विविध पुस्तके, इंटरनेट इ. माध्यमांतून मिळू शकते. तसेच आपण  www.giftingtrees.blogspot.in या ब्लॉग ला ही भेट देवू शकतात. मी इथे विविध स्थानिक झाडांची फोटोसहीत माहिती अगदी सहज-सोप्या इंग्रजी भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशी वनस्पतींचे तोटे आणि वृक्षरोपणाविषयी इतरही रंजक माहिती आपणास या ब्लॉग वर मिळू शकते.

आपण काय करू शकतो?

१) स्थानिक झाडांविषयी जाणीवपूर्वक ओळख करून घेणे व इतरांना ओळख करून देणे. तसेच कोणती झाडे आपल्या पर्यावरणास हानिकारक आहेत ते जाणून घेणे.
२) आपल्या परिसरात परदेशी झाडे लावणे अगत्याने टाळावे. कारण हल्ली झाडांसाठी, वृक्षारोपणासाठी फार कमी जागा शिल्लक राहते, विशेषत: शहरात. अशा वेळी त्या ठिकाणी जर परदेशी झाडे लावली तर आपले पक्षी कुठे जातील? हा विचार करणे.
३) आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एक तरी स्थानिक वृक्ष लावणे व वाढवणे. एखाद्या सुखद घटनेचा साक्षीदार म्हणून ही आपण झाडे लावू शकतात. दिवसेंदिवस वाढणारे ते झाड आपल्याला त्या सुखद घटनेची वर्षानुवर्षे आठवण करून देईल. उदा. लग्न, मुला/मुलीचा जन्मदिवस.
४) आपल्या परिसरातील एखादे निसर्गत: जगलेले स्थानिक झाड असल्यास त्याची काळजी घेणे .
५) स्थानिक झाडांची फुले-फळे केव्हा येतात? एखाद्या विशिष्ट झाडावर कोणकोणते पक्षी, फुलपाखरे व कीटक येतात? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणे. या सर्वांच्या नोंदी ठेऊन त्या इतरांसोबत वाटणे.

Monday, February 14, 2011

कर्म

सांयकाळी समुद्रकाठी फिरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फेकताना पाहिलं.
आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफडणारे तारामासे एक - एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फेकत होता.

न राहावून त्यानं त्या लहानग्याला विचारलं;
"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ?
आणि मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फरक पडणार आहे ?"

त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,
"यानं जगाला काय फरक पडेल ते मला माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फरक पडला ? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला."

विचार करा...

जर आता नाही तर केव्हा? जर तुम्ही नाही तर मग कोण???

Wednesday, August 18, 2010

पर्यावरण-वादी

एकदा एक निसर्गवादी पर्यावरण-तज्ञ एका चायनीज हॉटेल मध्ये गेली. जेवणाच्या आधी एक वृद्ध वेटर बांबूच्या चॉप स्टिक्स टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवू लागला. तिने वेटरला त्या बाबूच्या चॉपस्टिक्स परत घेऊन जायला सांगितले. तिला चॉपस्टिकसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूसाठी बाबूची वने नाहीशी होणं रुचत नसे. म्हणून ती तिच्या चॉपस्टिक्स घरूनच घेऊन येई. पण त्या वेटरला हे माहित नसावे कदाचित.. तिने आपल्या पर्स मधून तिच्या चॉपस्टिक्स बाहेर काढल्या. वेटरने चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "व्वा, फारच छान! हस्तिदंत!!"

यातला विनोद तसा फारच गंभीर आहे..आणि दुर्दैवी सुद्धा! पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कल्पना ह्या आपल्या जागी योग्यच आहेत; पण या कल्पना, विचार आणि आदर्श हे जे पर्यावरणशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्याचा दावा करतात, त्यांच्याकडूनच पायदळी तुडवले जातात. पर्यावरणवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांना स्वत:वर इतका विश्वास असतो कि आपण चुका करूच शकत नाही असेच त्यांना वाटते. त्यांची 'कार्ये' अगदी सहजगत्या त्यांच्या नजरेतून सुटतात. एकीकडे लाकूड तोडीचा, वृक्ष-तोडीचा निषेध करायचा आणि घरी मात्र 'वूडन-फ्लोरिंग' व अजस्त्र लाकडी फर्निचर बनवून घ्यायचं याला काहीच अर्थ नाही! पर्यावरणाला आणि संबंधित लोकांना मात्र ते स्वत:चीच मालमत्ता असल्यासारखी वापरतात, त्यांवर आपले विचार थोपवतात. एखादा उपक्रम अयशस्वी झालाच तर त्याच खापर फोडतात ते संसाधनांच्या अवाढव्य मागणी वर..

हल्ली वन्यप्राणी व निसर्ग छायाचित्रणाचे फार खुळ आहे. मोबाईलच्या क्रांतीमुळे तर शेंबड नाक साफ न करता येणारे दिग्गज ही मोबाईलने फोटो काढतांना दिसतात. मग त्या निमित्ताने वन्यप्राणी- अधिवासाच्या निकट जाणे ओघानेच आले. आणि जास्तीत जास्त आगळा व अद्वितीय फोटो काढण्याच्या नादात ते कधी संबंधित वन्यप्राण्याच्या अधिवासाचे नुकसान करतात हे त्यांचे त्यांना देखील उमगत नाही. काही दिवसांपूर्वी मी एका जंगलात भटकंती करायला गेलो होतो. तेव्हा मला एक लहान पक्ष्याचे घरटे दिसले. झाडाची पाने वाकवून तिने आडोसा तयार केला होता आणि त्यात अंडी घातली होती. त्या घरट्याची अवस्था पाहून माझ्या चटकन लक्षात आलं कि एखादा 'निसर्ग-मित्र' येथे येऊन गेला आहे. बाजूची काही पाने जी आडोशाला कारणीभूत ठरत होती ती तुटून पडली होती. जवळच बिस्कीटच्या पुड्याची आवरणं पडली होती. बाजूच्या रस्त्यावरून घरट्याच दर्शन अगदी सहजपणे होत होतं.

देव जाणे तो पक्षी तिथे परत येईल ही कि नाही?! त्या 'निसर्ग-मित्रा' चा घटकाभर विरंगुळा झाला असेल ही; पण त्या इवल्याशा पक्ष्याची महिन्यांची मेहनत वाया गेली. शिवाय घरट मोडल्यामुळे ती आता तिची अंडी उबवायला येणार नाही. पुन्हा अंडी घालायची म्हटली तर पुढच्या विणीच्या हंगामाची वाट पाहावी लागणार हे वेगळच! म्हणजे किती मोठे, तिहेरी नुकसान झाले हे पर्यावरणाचे!! वर नंतर हे असेच 'निसर्ग-मित्र' बोंभाटा करणार कि पक्ष्यांची संख्या घटते आहे.. हेच का आपले निसर्ग-प्रेम? काय अर्थ आहे अशा निसर्ग-प्रेमाला???

स्वत:ला सृष्टी-शास्त्रज्ञ म्हणवणारे, निसर्ग-वादी म्हणवणारेच जेव्हा असं काही करू लागतात तेव्हा वाटत कि सामान्य माणूस अशा 'निसर्ग-मित्रां' पेक्षा कितीतरी पटींनी बरा.. योग्यायोग्य जरी कळत नसलं तरी त्यांना इतक माहित असतं कि चिमणीच्या घरट्याला, अंड्यांना हात लावला तर ती ते घरट सोडून निघून जाते. निदान या समजुतीमुळे तरी सामान्य माणूस पक्ष्यांच्या घरट्याजवळ जात नाही...

पण हे समजण्यास जितके सोपे आहे तितकेच अंगीकारण्यास महाकठीण! निसर्गाला नुसता दिखावा करणाऱ्या सृष्टी-वादी पर्यावरण-तज्ञांची गरज नाहीये. निसर्गाला खरी गरज आहे ती त्यावर निरागस प्रेम करणाऱ्या निसर्ग-प्रेमींची! निसर्गाला आपलं मानणाऱ्यांची!!!

Saturday, July 3, 2010

मानसां, मानसां..कधी होशीलं माणूस?

"तुझा गीतेवर विश्वास आहे का? हिंदूंचा सर्वात पवित्र ग्रंथ!" दिपकचा आवाज आक्रमक झाला होता.
"हो रे बाबा.. आहे!" माझ्या आवाजात सारवा-सारव होती.
"मग हे पहा.. यात स्पष्ट लिहिलेलं आहे कि मनुष्य हा सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ आहे. आणि मला तर वाटत कि तोच सर्वात सुखी ही आहे."
"असं तू कसं काय म्हणू शकतोस?"
"अरे मनुष्य सर्वांत बुद्धिमान आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर पुष्कळ गोष्टींचा शोध लावला आहे.. आपल जीवन सुखकर बनविलेल आहे." इति दिपक.
"बर बाबा तू म्हणशील तसं.." मी वाद तर संपवला. पण माझ्या डोक्यात मात्र विचार सुरूच होते..

माझा मित्र दिपक.. आम्ही एकाच रूम मध्ये राहत असू. दिपक तसा फार अध्यात्मिक.. रोज गीता-वाचन, गायत्री-मंत्र आणि देव-पूजा ठरलेली. आणि मी नेमका विरुद्ध! मी नास्तिक आहे अशातला भाग नाही. पण मूर्ती-पूजेवर माझा विश्वास नाही. देव आहे आणि तो सगळीकडे आहे, सगळ्या सजीवांमध्ये आहे. मग फक्त ज्याला सगळे 'देव' म्हणतात, म्हणून त्याची पूजा करायची आणि इतरांशी आपल्याला वाटेल तसे वागायचे याला काही अर्थ आहे का? मला तरी ते नाही पटत. पण खरच विचार करण्याजोगी गोष्ट आहे नाही?! मनुष्य..सर्वांत सुखी आणि श्रेष्ठ???

का? इतर प्राणी सुखी नसतात का??

पशु, पक्षी, किटके, जलचर, सर्प-वर्गीय आणि वृक्ष-वेली सुद्धा.. सारे, सारेच आपआपल्या विश्वात सुखीच असतील की! बिया जमिनीत रुजतात आणि एखाद्या प्रसन्न सकाळी अंकुरतात. हळूच एक अंकुर जमिनीच्या वर डोकावतो..कालांतराने बहरतो, फुलतो. पठारे, डोंगर, दऱ्या-कपारी इतकच काय तर भिंतींवरही काही झाडे उगवतात आणि जगतात.. शाकाहारी प्राणी हिरवं गवत, पाला, पाने खातात, तर मांसाहारी प्राणी शिकार करतात. पक्षी आकाशात विहार करतात. विविध फळा-फुलांवर ताव मारतात.. मुंग्या, मधमाश्या कश्या एवढ्या सहकार्याने एकत्र काम करतात?! सर्वांची कामे कशी एकदम सुरळीत चालू असतात??!

जर ते सुखी नसते, त्यांच्यात चैतन्यच नसतं, तर ही सगळी कामे होऊ तरी शकली असती का? कशावरून सर्व सजीव त्यांची ही कामे करतांना आनंद उपभोगत नसतील? माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर पुष्कळशा सुख-सोयी निर्माण करून स्वत:चे आयुष्य फारच सुखकारक बनविलेले आहे. पण याचा अर्थ असा होत नाही कि तो सर्वांत सुखी आहे म्हणून! आणि खर पाहता त्याने आपले आयुष्य आरामदायक बनविण्याच्या नादात आणखीनच क्लिष्ट बनविले आहे. तो स्वत:च बनविलेल्या नियम आणि कायद्याच्या जालात गुरफटला आहे. खर पाहता, त्याने नियम आणि कायदे बनविले ते स्वत:साठी, मनुष्य-जाती साठी. पण आज तेच नियम आणि कायदे त्याला माणसापेक्षा जास्त महत्वाचे झाले आहेत. नियम तो नियम.. मग माणुसकी चुलीत का ना जावो..कोणाला नरक-यातना का ना भोगाव्या लागोत! सर्व प्राणिमात्रांत शक्तिमान आहे तो.. तो काहीही करू शकतो. पण मोठ्या सामर्थ्याबरोबर मोठी जबाबदारी ही येते, हे तो साफ विसरला आहे. स्वत:ची प्रगती, विकास करतांना कुठे थांबायला हव हे अजूनही त्याला कळलेलं नाही. आणि आपला विकास साधतांना निसर्गाला, इतर सजीवांना तर धोका नाही ना, हे पहायला त्याला वेळ कुठे आहे? अहो बाकीचे विसरा..पण तो इतर माणसांचे तरी हित पाहतो का? सर्वांशी प्रेमभावाने वागतो का? तर नाही..इथेही लढाया, हल्ले, वर्ण-भेद, द्वेष-तिरस्कार, कुरघोडी करण्याचे प्रयत्न आहेतच की... मग माणूस सर्व-श्रेष्ठ कसा? निसर्गाने जर माणसाला इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमान बनविल आहे, तर तो फक्त स्वत:पुरताच विचार कसा करतो?? का आपला थोडा वेळ, आपले सामर्थ्य आणि आपली बुद्धी तो मानवजाती साठी, निसर्गासाठी, पशु-पक्ष्यांच्या कल्याणासाठी खर्च करत??? उलट असे प्रश्न ज्या व्यक्तीला पडतात, त्याला आपणच विचारतो, "बाबा रे, ठीक आहेस ना? तुला काही दूसरा काम-धंदा नाहीये का??"

आज माणसाची ही समजूत, नव्हे असं ठाम मत झाल आहे कि तो आहे म्हणून झाडे आहेत, इतर प्राणी-पक्षी आहेत.. पण वास्तव तर हेच आहे कि ते सगळे आहेत, म्हणून आपण आहोत..!

Saturday, June 5, 2010

"झाडे लावा, झाडे जगवा!"

आज सकाळी भल्या पहाटे मला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. तसा हा रोजचाच नित्यक्रम! आम्ही घरा नजीकच्या बागेत बरीच झाडे लावली होती. मग पक्षी तर येत असतच पण रंगीत फूलपाखरे, सरडे आणि विविध प्रकारचे किडे ही असत. मला या सर्वांना पाहून भरपूर आनंद होई. बालपणापासुनच मला निसर्गाचे वेड! अगदी 'मोठा झाल्यावर मी वनराजीत रहायला जाईन' इतपत!! पक्ष्यांच्या अथवा फूलपाखरांच्या मागे धावायला मला फार आवडे. त्यांच्या सारखं आपल्यालाही स्वच्छंदी उडता आलं तर काय मज्जा येईल असही हळूच वाटुन जाई. असो.

तर विविध पक्ष्यांच्या आवाजाचा कानोसा घेत मी प्रातःविधी आटोपले आणि नेहमी प्रमाणे बागेत आलो. झाडांना पाणी घालणे, तण काढणे आणि बागेत फेरफटका मारणे हा माझा आवडता छंद! झाडांवर पाणी फवारताना माझे काही मित्र सुद्धा उडणाऱ्या तुषारांचा आनंद लुटायचे. हे मित्र म्हणजे शकरखोरे, चश्मेवाला, मैना आणि कोतवाल पक्षी! क्वचित प्रसंगी कोकिळ आणि बुलबुल ही असत. मी त्यांना मित्र संबोधले कारण आमची ही भेट रोजची ठरलेली असायची. त्यात सहसा बदल होत नसे. आजही आम्ही बराच वेळ एकत्र खेळलो. मज्जा आली! ह्या आनंदसोहळ्या चे मला फार अप्रूप वाटे. मनात विचार येई की आपल्या घराभोवतीच नाही तर सगळा गाव आणि परिसर ह्या हिरवाई ने नटला पाहिजे!

पण फक्त विचार करून काहीच होत नाही. म्हणूनच की काय मी स्थानिक निसर्गवादी संस्थेत नाव-नोंदणी करून आलो होतो. ठराविक प्रसंगी आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम ही आयोजित करत असू. कधीतरी गावातून 'हरित दिंडी' ही काढत असू. "झाडे लावा झाडे वाचवा" या घोषणा ही असतच. एक अलगच आनंद असायचा या कार्यात. या निमित्ताने इतर निसर्गप्रेमी व्यक्तींशी ही ओळख होत असे. आम्हा सर्वांनाच आम्ही करत असलेल्या या सामाजिक कार्याचा फार अभिमान वाटे. सीमेंटच्या वाढत चाललेल्या जंगलात जर आपण पशुपक्ष्यांना त्यांचा अधिवास वापस करू शकलो तर याहून चांगले काम ते कोणते?! नाही का?!

आज ही मी एक नवीन रोपटे लावले. आताशा सूर्य आग ओकत होता. म्हणून मी घरात परतायच ठरवल. तेवढ्यात मला ठक ठक आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहतो तर काय एक माणूस रस्त्या लगतच झाड तोडत होता. माझी पायाची आग मस्तकात गेली. अरेच्चा! हा तर शेजारच्या बिल्डिंगचा वॉचमन! बिल्डिंगच बांधकाम चालू असतांना वॉचमन ठेवायची प्रथाच पडली आहे हल्ली. त्यांना एक पत्र्याची खोली बांधून दिली जाते. मग हे लोक वाटेल तसे राहतात. स्वयंपाक व पाणी गरम करावयासाठी सरपण वापरतात. पण मग त्यासाठी चांगली जिवंत झाडांची कत्तल करायची का?? मी कुठे तरी वाचलं होत की जर कोणी वृक्ष-तोड़ करत असेल तर त्याची ही पोलिसांकडे फिर्याद करता येते..

रागाने माझा चेहरा लाल भड़क झाला होता. आम्ही झाडे लावतो ते काय या लोकांसाठी?? असेच स्वार्थी लोकं जबाबदार आहेत जागतिक उष्णता उच्चांकाला! मी लागलीच घरात आलो. माझी पाऊले लाकडी टी-पॉयवर ठेवलेल्या दूरध्वनी संचाच्या दिशेने चालू लागली.. आणि मी जागीच थबकलो. माझं लक्ष आमच्या लाकडी फ़र्नीचरकड़े गेलं. पलंग, दिवाण, खुर्च्या, कपाट असे कितीतरी सामान... हाय रे देवा! या फ़र्नीचर साठी किती झाडांची कत्तल झाली असेल कुणास ठाउक?! माझ्या रागाची जागा आता शरमेने घेतली होती. आपण स्वतःही वृक्ष-तोड़ केलीच आहे की! मग भलेही ते लाकुड आम्ही पैसे देऊन खरेदी केलं असेल पण झाडांचा जीव तर गेलाच ना?! आपण असे लाकडी फर्नीचर विकत घेतो म्हणूनही वृक्ष-तोड होतेच की..!

माझ्या पायातुन तर जसे काही प्राणच निघून गेले होते आणि डोक्यात विचारांचे काहूर माजले होते!