"तुझा गीतेवर विश्वास आहे का? हिंदूंचा सर्वात पवित्र ग्रंथ!" दिपकचा आवाज आक्रमक झाला होता.
"हो रे बाबा.. आहे!" माझ्या आवाजात सारवा-सारव होती.
"मग हे पहा.. यात स्पष्ट लिहिलेलं आहे कि मनुष्य हा सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ आहे. आणि मला तर वाटत कि तोच सर्वात सुखी ही आहे."
"असं तू कसं काय म्हणू शकतोस?"
"अरे मनुष्य सर्वांत बुद्धिमान आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर पुष्कळ गोष्टींचा शोध लावला आहे.. आपल जीवन सुखकर बनविलेल आहे." इति दिपक.
"बर बाबा तू म्हणशील तसं.." मी वाद तर संपवला. पण माझ्या डोक्यात मात्र विचार सुरूच होते..
माझा मित्र दिपक.. आम्ही एकाच रूम मध्ये राहत असू. दिपक तसा फार अध्यात्मिक.. रोज गीता-वाचन, गायत्री-मंत्र आणि देव-पूजा ठरलेली. आणि मी नेमका विरुद्ध! मी नास्तिक आहे अशातला भाग नाही. पण मूर्ती-पूजेवर माझा विश्वास नाही. देव आहे आणि तो सगळीकडे आहे, सगळ्या सजीवांमध्ये आहे. मग फक्त ज्याला सगळे 'देव' म्हणतात, म्हणून त्याची पूजा करायची आणि इतरांशी आपल्याला वाटेल तसे वागायचे याला काही अर्थ आहे का? मला तरी ते नाही पटत. पण खरच विचार करण्याजोगी गोष्ट आहे नाही?! मनुष्य..सर्वांत सुखी आणि श्रेष्ठ???
का? इतर प्राणी सुखी नसतात का??
पशु, पक्षी, किटके, जलचर, सर्प-वर्गीय आणि वृक्ष-वेली सुद्धा.. सारे, सारेच आपआपल्या विश्वात सुखीच असतील की! बिया जमिनीत रुजतात आणि एखाद्या प्रसन्न सकाळी अंकुरतात. हळूच एक अंकुर जमिनीच्या वर डोकावतो..कालांतराने बहरतो, फुलतो. पठारे, डोंगर, दऱ्या-कपारी इतकच काय तर भिंतींवरही काही झाडे उगवतात आणि जगतात.. शाकाहारी प्राणी हिरवं गवत, पाला, पाने खातात, तर मांसाहारी प्राणी शिकार करतात. पक्षी आकाशात विहार करतात. विविध फळा-फुलांवर ताव मारतात.. मुंग्या, मधमाश्या कश्या एवढ्या सहकार्याने एकत्र काम करतात?! सर्वांची कामे कशी एकदम सुरळीत चालू असतात??!
जर ते सुखी नसते, त्यांच्यात चैतन्यच नसतं, तर ही सगळी कामे होऊ तरी शकली असती का? कशावरून सर्व सजीव त्यांची ही कामे करतांना आनंद उपभोगत नसतील? माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर पुष्कळशा सुख-सोयी निर्माण करून स्वत:चे आयुष्य फारच सुखकारक बनविलेले आहे. पण याचा अर्थ असा होत नाही कि तो सर्वांत सुखी आहे म्हणून! आणि खर पाहता त्याने आपले आयुष्य आरामदायक बनविण्याच्या नादात आणखीनच क्लिष्ट बनविले आहे. तो स्वत:च बनविलेल्या नियम आणि कायद्याच्या जालात गुरफटला आहे. खर पाहता, त्याने नियम आणि कायदे बनविले ते स्वत:साठी, मनुष्य-जाती साठी. पण आज तेच नियम आणि कायदे त्याला माणसापेक्षा जास्त महत्वाचे झाले आहेत. नियम तो नियम.. मग माणुसकी चुलीत का ना जावो..कोणाला नरक-यातना का ना भोगाव्या लागोत! सर्व प्राणिमात्रांत शक्तिमान आहे तो.. तो काहीही करू शकतो. पण मोठ्या सामर्थ्याबरोबर मोठी जबाबदारी ही येते, हे तो साफ विसरला आहे. स्वत:ची प्रगती, विकास करतांना कुठे थांबायला हव हे अजूनही त्याला कळलेलं नाही. आणि आपला विकास साधतांना निसर्गाला, इतर सजीवांना तर धोका नाही ना, हे पहायला त्याला वेळ कुठे आहे? अहो बाकीचे विसरा..पण तो इतर माणसांचे तरी हित पाहतो का? सर्वांशी प्रेमभावाने वागतो का? तर नाही..इथेही लढाया, हल्ले, वर्ण-भेद, द्वेष-तिरस्कार, कुरघोडी करण्याचे प्रयत्न आहेतच की... मग माणूस सर्व-श्रेष्ठ कसा? निसर्गाने जर माणसाला इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमान बनविल आहे, तर तो फक्त स्वत:पुरताच विचार कसा करतो?? का आपला थोडा वेळ, आपले सामर्थ्य आणि आपली बुद्धी तो मानवजाती साठी, निसर्गासाठी, पशु-पक्ष्यांच्या कल्याणासाठी खर्च करत??? उलट असे प्रश्न ज्या व्यक्तीला पडतात, त्याला आपणच विचारतो, "बाबा रे, ठीक आहेस ना? तुला काही दूसरा काम-धंदा नाहीये का??"
आज माणसाची ही समजूत, नव्हे असं ठाम मत झाल आहे कि तो आहे म्हणून झाडे आहेत, इतर प्राणी-पक्षी आहेत.. पण वास्तव तर हेच आहे कि ते सगळे आहेत, म्हणून आपण आहोत..!
Saturday, July 3, 2010
Subscribe to:
Posts (Atom)
