Thursday, June 3, 2010

ती...एक पणती!

पावसाळ्याला अलीकडेच सुरुवात झाली होती. हवेत गारवा होता. आणि ती..एका हिरव्यागार टेकडीसमोर उभी होती. ती टेकडी विविध वृक्षवेलींनी बहरलेली आहे. वड, पिंपळ, पळस, नारळ, शेवगा, चिंच, कडूनिंब अशी पंधरा फूटी झाडे गर्द सावलीस कारणीभूत ठरत आहेत. बऱ्याच पशुपक्ष्यांना आसरा ठरत आहेत. सोबत धायटी, करवंदासारखी विविध झुडूपे देखील आहेतच.

समोरचं दृष्य ती भरल्या डोळ्यांनी पाहत होती. समाधान आणि सार्थकी भाव तिच्या चेहऱ्यावर तरळत होते. साधे कपडे, ओसाड कपाळ, शांत चेहरा, दाट लांबसडक केस, दागिने नावालाही नाहीत..जणू लंकेची पार्वती वाटावी अशी ती. तरीही चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि गूढ हर्ष उठून दिसत होता. फक्त तीन वर्षांपूर्वी जर तुम्ही तिला पाहिलं असतं, तर आज या अवस्थेतल्या तिला पाहून तुम्हाला धक्काच बसला असता! तिचं नाव वसुधा. एक हसरी आणि चुणचुणीत मुलगी. सकारात्मक, स्वतंत्र आणि आधुनिक विचारांची! इतर मुलीं प्रमाणे तिच्याही डोळ्यात बरीचशी स्वप्ने असणं सहाजिकच होतं. मुळातच हुशार असलेल्या वसुधाला MBBS ला प्रवेश सहजगत्या मिळाला. खेळकर स्वभाव असल्याने तिला पूष्कळ मित्र-मैत्रिणी होत्या. अशातच तिची ओळख संजीवन सह झाली. तो तिच्याच बरोबर शिकायचा. लवकरच मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. आई-वडिलांची फसगत दोघांनाही करावयाची नव्हती म्हणून स्वत: काही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी सर्व हकीकत घरी सांगितली. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून दोन्ही घरांनी लग्नाला परवानगी दिली. वसुधा आणि संजीवनच्या आनंदाला तर पारावार नव्हता. MBBS च शेवटचं वर्ष संपताच लग्न करायचं असं ठरलं. दिवस मजेत जात होते.

सरते शेवटी लग्नाचा दिवस उजाडला..५ मे २००९. मे महीन्याच्या रखरखणाऱ्या उन्हात दोन जीवांची बहरलेली प्रीती आज नवीन आयुष्यात पाऊल ठेवणार होती. मागचे काही आठवडे लग्नाच्या तयारीत निघून गेले. आमंत्रण-पत्रिका वाटप, लग्नाची खरेदी, नातेवाईकांच्या भेटी..बरीच कामे. कितीतरी दिवसांपासून वसुधा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. आज ती आणि तिचा संजीवन एक होणार होते..कायमचे! तिकडे संजीवनची वाजत-गाजत वरात निघाली होती. मित्र मंडळी बेधुंद नाचत होती. इतक्यात संजीवनला चक्कर आला आणि तो घोडी वरुन खाली पडला. झाले!! सर्व आनंदी चेहरे चिंताक्रांत झाले. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले..

वधुपक्षालाही वर्दी मिळाली. सर्वांचा नूर पालटला. सगळे रुग्णालयाकडे निघाले. डॉक्टरांनी निदान केले..उष्माघात. हाय रे देवा! उष्माघाताने आणखी एक बळी घेतला तर!! वाढत्या उष्णतेबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण ती कधी आपल्याच मुलाचा बळी घेईल असं संजीवनच्या आईवडिलांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी दु:खातिरेकाने हंबरडाच फोडला. वधुपक्षावरही शोककळा पसरली. वसुधा तर सुन्नच झाली. तिचे डोळे एकटक संजीवन कडे पाहत होते. ती रडली तर दुःख हलके होईल म्हणून तिच्या आईने तिला रडवण्याचा बराच प्रयत्न केला पण व्यर्थ! तिच्याकडे पाहून सैतानालाही दयेचा पाझर फुटला असता..पण नियती समोर कुणाचे काय चालले आहे!

असेच काही दिवस गेले. वसुधाच्या आईवडिलांनी तिला धीर देण्याचा बराच प्रयत्न केला. पण स्वत: तेही फार खचले होते. तिच्यासमोर तिचे अख्खे आयुष्य होते, याचीच चिंता त्यांना खात होती. संजीवनच्या आईने तर तिला दुसरे लग्न करण्याचेही सुचवले. पण वसुधाला ते मान्य नव्हते. ती म्हणाली, "आई, आलेल्या संकटावर मात करण्याऐवजी आपण परिस्थितीसोबत जुळवून घेण्यात काय अर्थ आहे? जागतिक हवामान बदलाविषयी आपण सर्वच ऐकतो, पण करत काहीच नाही. मोठी होत जाणारी शहरे आणि सतत लोप पावणारी जंगले हीच वाढत्या उष्णतेसाठी कारणीभूत आहेत. भारताला ३३% वनक्षेत्र अपेक्षित असुनही केवळ २०% च वनक्षेत्र आजमितीला उपलब्द्ध आहे. किंबहुना तेही सतत कमी होत चालले आहे. वनविभागाच्या जमीनीवर एक तर वृक्षतोड चालते अथवा स्वार्थी मनुष्य तिथे घुसखोरी करतो. पण कोणीही या विरळ होत चाललेल्या जंगलांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत नाही."

"अगं पण पोरी, हे तुझं काम म्हणजे रामसेतु बांधण्यासाठी एका खारुताई ने मदत करण्या-सारखेच आहे." इति आई.



"मला ठाऊक आहे ते. पण किती दिवस आपण हातावर हात ठेऊन बसायचं? काहीही असो. माझ्यावर जो प्रसंग गुदरला आहे, तो आणखी कोणावर गुदरू नये यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन. माझ्या सारखी आणखी एखादी वसुधा होऊ नये यासाठी झटत राहीन."

आज तिच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि तिच्या दृढ़निश्चयते कडे पाहून माझ्या मनात विचार येतोय, "या धरणी मातेला एकाच नाही, तर हजारों वसुधांची गरज आहे..!"

1 comment:

  1. Seriously.......deeply ghusa hai ye thought dilme.......Aapne ye sab mera matlab hai base of this perticular story, kahanse liya?

    ReplyDelete